Friday, February 5, 2010

यमुआजी

गेले काही दिवस मन थार्‍यावर नाही .विचारांना उसंत नाही...जुन्या आठवणींच मोहळ उठतय आणि सैरभैर झालेल्या मनाला आवर घालण कठीण जातय.........

काल बसल्या बसल्या अचानक यमुआजीचा चेहरा डोळ्यासमोर तरळला आणि माझ्या नकळत मी माझ्या बालपणीचा काळ अनुभवु लागले......बसस्टँड वर उतरले कि भिवाकाका बैलगाडीतुन आणायला यायचा ....ताठ मानेने गावात बैलगाडीतुन घरापर्यंत जाताना आपण किती श्रीमंत अस उगीच मनात यायच्......घराच्या उंबर्‍यावर आजी उभी असायची ,घरात पाऊल ठेवण्यापुर्वी यमुआजी काहि तरि पुटपुटत मिठमोहरी उतरायची .मी कितीही ते ऐकायचा प्रयत्न केल तरी मला तिचे ते बोल कधी समजलेच नाहीत..सामान घरात टाकल की झाल ........मग माझे पाय जमीनीला लागणच अशक्य...

सतत यमुआजीच्या मागे कुठे यमुआजी हळद कुटतेय तिथे जाऊन एक नाद धरत हळद कुटायला पुढे पुढे करायच ,तर कुठे यमुआजी पिठ दळायला जात्यावर बसली कि तिच्या ओव्या ऐकत जात्याचा द्ट्ट्या हातात धरायचा आणि प्रयत्नपुर्वक जात फिरवायच्...तिच्या दटावणीला न जुमानता....मधेच लहर आली तर तिच्या शेजारी बसुन तिच्या हाताच्या ओघळणार्‍या मऊसुत त्वचेला स्पर्श करत तिच्या मांडिवर स्वतःच्याही नकळत झोपी जायच्......रात्री झोपताना आजी व यमुआजी दोघी अंगणातल्या बाजेवर बसवुन गोष्टि सांगत्.....आमच्या घराच्या आंगणातुन समोरच्या डोंगरातल्या टॉवरचे दोन लाल दिवे दिसत्.......मी झोपायला कटकट करतेय बघितले कि मग ते लाल दिवे म्हणजे वाघोबाचे डोळे आहेत आणि आता झोपली नाहीस तर तो वाघोबा इकडेच येईल अशी भिती दाखवत यमुआजी मला झोपायला भाग पाडे...........

सकाळी डोळे चोळत उठाव तर यमुआजी परसदारी फुल तरी तोडताना दिसायची नाहितर सडा घालताना....चुलीवरच्या गरम पाण्याने शेकत यमुआजीनेच नहाण घालाव म्हणुन भोकाड पसरुन रडण सुरु केल की बिचारी हातातल काम सोडुन माझ्या दिमतीला यायची.....मला तर कधी कधी मी जणू राजकन्याच आहे अस वाटायच्....गोष्टिच्या पुस्तकांचा परिणाम्.....परसदारच्या प्राजक्ताच्या झाडाखाली उभ राहुन प्राजक्ताची फुल अंगावर पाडुन घेण्यातला आनंद काही औरच होता......वाड्यातल्या कपिलेच निरस दुध पिताना तेंव्हा मिळणारा आनंद आता अनुभवायला देखिल मिळत नाही.........
तर हि यमुआजी म्हणजे माझ्या आजीची जिवश्च कंठश्च मैत्रिण ,सखी सगळ काही....आजी सांगायची यमुआजी माझ्या बाबांची दुधआई होती....अस का हा प्रश्न कधी विचारला नाही आणि विचारायची आवश्यकता देखिल वाट्ली नाहि कधी....माझ्या आईवर फार जीव यमुआ़जीचा ............आजी कडे गेल की आईच्या पायाला मालिश करायला यमुआजी नेहमी येत असे ...आईला फार ओशाळवाण व्हायच पण यमुआजी कुठली ऐकायला ती हट्टाने मालिश करायचीच.......
पुढे पुढे वरच्या इयत्तांमधे गेल्यावर आजी कडे जाण कारणपरत्वेच होऊ लागल...........पण यमुआजी मात्र २ महिन्यातुन एकदा यायचीच यायची ठाण्याला .खरतर तिची लेक रहायची ठाण्याला पण यमुआजी मात्र दोन दिवसाच्यावर तिच्याघरी रहावयास तयार नसे...दोन दिवस झाले कि ती आलीच पाहिजे आमच्याकडे.......यमुआजीच्या आगमनानंतर मी पुन्हा राजकन्येच्या भुमिकेत असायचे.....शाळेतुन येताना मुद्दाम यमुआजीला दाखवायच म्हणुन मैत्रिणिंना घरी घेऊन यायचे........
क्रमशः